मुंबई: राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे आणि पूर्ण क्षमतेने होण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला असून, त्या अंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील तब्बल २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभागाचे कार्य अधिक गतीने आणि पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पशुपालकांना मार्गदर्शन करणे, आरोग्य सेवा पुरवणे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे शक्य होते.
सुधारित आकृतीबंधानुसार, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्याच्या स्थितीत केवळ १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होणार आहे, कारण ३१ डिसेंबर २०२५ अखेर आणखी ८ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे एकूण रिक्त पदांची संख्या २८०६ पर्यंत पोहोचणार आहे. मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे विभागाच्या दैनंदिन कामकाजावर आणि योजनांच्या अंमलबजावणीवर नकारात्मक परिणाम होत होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने कार्यवाही करत पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पशुधन विकास अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, यापूर्वीच्या सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतीक्षा यादीतील ११ पदे तातडीने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित २७९५ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला औपचारिक मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्याची विनंती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाल्यास पशुसंवर्धन विभागाला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि विभागाचे कामकाज अधिक वेगाने सुरू होईल.
हे पण वाचा » डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ७ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि दुग्धव्यवसाय तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना मिळेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.
पंकजा मुंडे यांच्या या निर्णयामुळे पशुसंवर्धन विभागात नवचैतन्य निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन विभागाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.