आता महिलांना मिळणार दरमहा ७०००/- रुपये, LIC ने आणली खास योजना; जाणून घ्या…

LIC Bima Sakhi Yojana: केंद्र सरकार, देशात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून अनेक योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. जसे की, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, महिला उद्योगिनी योजना, सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, इत्यादींचा समावेश होतो.

या योजनांचा मुख्य उद्देश महिलांचा सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. या उपक्रमांद्वारे महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतील.

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) विशेषतः महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने महिलांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित होते आणि त्याचबरोबर त्यातून त्यांना चांगला नफा सुद्धा मिळतो.

एलआयसीने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आह. या योजनेचे नाव ‘विमा सखी योजना’ आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी हरियाणामध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्याकडून ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाद्वारे, महिलांना विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी तयार केले जाते.

या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षी, सहभागी महिलांना दरमहा ७,००० रुपये दिले जातात. दुसऱ्या वर्षी, दरमहा ६,००० रुपये दिले जातात. आणि प्रशिक्षणाच्या तिसऱ्या आणि अंतिम वर्षात, महिलांना दरमहा ५०० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातात.

तीन वर्षांच्या कालावधीत महिलांना एकूण २ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय, LIC च्या विमा पॉलिसीची विक्री करून महिला पहिल्याच वर्षी ४८,००० रुपयांपर्यंत कमिशन कमावू शकतात.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना “विमा सखी” प्रमाणपत्र तसेच एलआयसीचा एजंट कोड प्रदान केला जातो. त्यानंतर ती महिला अधिकृतपणे LIC ची विमा एजंट म्हणून काम करू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज करावा.