मुंबई: सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून मानले जाते. आजकाल दैनंदिन सुविधा ऑनलाइन उपलब्ध झाल्यामुळे वेळ खाऊ कामे देखील काही मिनिटांमध्ये पूर्ण होतात. या धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापातून वेळ काढून एखादी गोष्ट करायची झाल्यास अतिशय कठीण होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर विज बिल भरणे हे पूर्वी अतिशय वेळ खाऊ आणि त्रासदायक काम होते. तासंतास रांगेत उभे राहून बिल भरावे लागायचे. पण हेच काम आता मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या एका क्लिकवर करता येत आहे.
विज बिल भरण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे पेमेंट ॲप किंवा बँकांचे अधिकृत ॲप वापरतात. विज बिल कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना थेट एसएमएस द्वारे बिल भरण्याची लिंक पाठवली जाते. याच गोष्टीचा फायदा घेत फसवणूक करण्याचा डाव काही लोकांकडून आखला जात आहे.
अनेक वेळा आपल्याला माहीत नसणाऱ्या नंबर कडून मेसेज येत असतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या ऑफर, कूपन आणि लकी ड्रॉ सारख्या स्कीम बद्दल माहिती दिली जाते. अनेक वेळा असे मेसेज फसवे असतात. कारण वीज कंपनीच्या एका ग्राहकाला “तुमचं लाईट बिल थकीत आहे आणि दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही त्वरित भरावे नाहीतर तुमचे वीज कनेक्शन कट केले जाईल.” असा मेसेज पाठवण्यात आला होता.
आपले वीज कनेक्शन काटले जाण्याच्या भीतीने त्या व्यक्तीने त्या लिंक वर क्लिक करून घाईघाईने पैसे भरणा केले. पण, त्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की ती लिंक बनावट होती. यामुळे त्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर झालेच पण बिलाचा भरणा देखील झाला नाही.
अशा प्रकारची फसवणूक अनेकांची होत असल्यामुळे वीज वितरण कंपन्यांनी नागरिकांना अशा फसव्या मेसेज द्वारे बिल न भरण्याचे आवाहन केले आहे. यासाठी वीज वितरण कंपन्यांकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
• कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
• “तुमचं कनेक्शन कट होईल” असा मेसेज आल्यास घाबरून जाऊ नका.
• बिल भरण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपचा वापर करा.
• तुमचा मोबाईल नंबर अनधिकृत एजंट किंवा संगणक केंद्रात देऊ नका.
• कंपनीकडून, वीजबिल भरणे किंवा अर्जासंबंधित माहिती फक्त नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवली जाते.
• अशा प्रकारची कोणतीही शंका असल्यास, ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या ऑफिसला भेट द्यावी.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारच्या फसव्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते, मोबाईलवर असणारा डेटा आणि तुमची इतर वैयक्तिक माहिती देखील चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत मोबाईल ॲप, दुकान आणि व्यक्तीमार्फत पैशांचे व्यवहार किंवा बिल भरणे सारखे ट्रांजेक्शन करू नये.
जर तुम्हाला वीज कनेक्शन कट होणार असल्याचा मेसेज आला असेल, तर वीज वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तुमची थकबाकी आहे की नाही हे तपासून घ्यावे. असे केल्यास आलेला मेसेज अधिकृत आहे की फसवा याबद्दल तुमची खात्री होईल.