The success story of Rucha Kulkarni from Beed

वडिल पिग्मी एजंट, मुलीने कष्टाचं चीज केलं; न्यायाधीश परीक्षेत आली राज्यात प्रथम!

यशोगाथा: बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील असामान्य जिद्दीची आणि परिश्रमाची गोष्ट समोर आली आहे. विठ्ठल कुलकर्णी, जे पिग्मी एजंट म्हणून काम करतात त्यांची कन्या ऋचा कुलकर्णी हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षेत मोठे घवघवीत यश मिळवले आहे. एवधच नाही तर संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले आहे. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेची मुख्य परीक्षा 2024 मध्ये झाली होती आणि नुकताच याचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

पिग्मी एजेंटची मुलगी बनली न्यायाधीश

ऋचाचे वडील श्री विठ्ठल कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून पिग्मी एजंट म्हणून शहरातील लोकांकडून अल्प प्रमाणात बचत जमा करण्याचे काम करतात. या कामातून मिळणारे अत्यल्प उत्पन्न आणि पत्नीचे अंगणवाडी शिक्षिकेचे मर्यादित वेतन, अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ऋचाला उच्च शिक्षण दिले. ऋचानेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे मोल जाणले आणि कठोर परिश्रम करून हे यश संपादन केले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कुलकर्णी कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या मुलीच्या या दैदीप्यमान यशाने विठ्ठल कुलकर्णी यांना आनंदाश्रू अनावर झाले.

ऋचा कुलकर्णी म्हणाली..

या नेत्रदीपक यशानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ऋचा कुलकर्णी म्हणाली, “मला खूप आनंद होत आहे. माझ्या या यशात माझ्या आई-वडिलांची खूप मोठी भूमिका आहे. वडील पिग्मी एजंट आहेत आणि आई पूर्वी अंगणवाडी शिक्षिका होती (तिने 2019 मध्ये हे काम सोडले). माझ्या अभ्यासाचे श्रेय केवळ 10 टक्के आहे, खरे श्रेय माझ्या आई-वडिलांचे कष्ट आणि माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आहेत.”

आपल्या वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीबद्दल बोलताना ऋचा पुढे म्हणाली, “माझे वडील पिग्मी एजंट आहेत आणि त्यांना 100 रुपयांच्या बचतीवर केवळ 2 रुपये कमिशन मिळते. या अत्यल्प उत्पन्नातून कुटुंबाचा 15 हजार रुपयांचा खर्च भागवणे किती कठीण होते, याची कल्पनाही करवत नाही. वडील अनेकदा दोनच कपड्यांवर राहिले, परंतु त्यांनी नेहमी आमच्या गरजा पूर्ण केल्या. आईनेही खूप कष्ट घेतले.”

ऋचाने समाजाला दिला महत्वाचा संदेश

आपल्या यशाचे श्रेय पूर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या श्रमाला देताना ऋचा हिने समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. ती म्हणाली, “मी आज जे काही आहे, ते केवळ माझ्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमामुळेच आहे. मुलींना शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे. लग्न हे मुलीच्या आयुष्यातील अंतिम ध्येय नसावे. शिक्षणानंतर लगेच मुलीचे लग्न करून देण्याचा विचार बदलणे गरजेचे आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलीला तिच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळायला हवी. जेव्हा एखादी मुलगी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करत असतो.”

हे पण वाचा » कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 10वी, 12वी पास साठी नोकरीची संधी!

ऋचाचे वडील म्हणतात..

आपल्या मुलीच्या या मोठ्या यशाबद्दल बोलताना श्री. विठ्ठल कुलकर्णी अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले, “बीड शहरातील लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांच्या उपकारांमुळेच आम्ही आज या टप्प्यावर पोहोचलो आहोत. मी गेल्या 35 वर्षांपासून पिग्मी एजंट म्हणून काम करत आहे आणि आजपर्यंत एका रुपयाचीही फसवणूक केली नाही. बीड शहरातील सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सहकार्य केले, त्यामुळेच हे शक्य झाले,” असे सांगताना त्यांना गहिवरून आले. “माझ्या लेकराने माझ्या कष्टाचे चीज केले, याचा मला खूप आनंद आहे,” असेही ते म्हणाले.

ऋचा कुलकर्णी हीची ही यशोगाथा केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी आपल्या जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या बळावर सर्वोच्च यश मिळवू शकते, हे तिने दाखवून दिले आहे.